Nashik Accident News Today: नाशिकमध्ये रविवारी रात्री एका भीषण रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात द्वारका सर्कलजवळ अयप्पा मंदिराजवळ सायंकाळी 7:30 वाजता झाला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, निफाड येथून धार्मिक कार्यक्रमाहून परतणाऱ्या 16 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर पाठीमागून धडकला. टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
रुग्णालयात उपचार सुरू
जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धावपळ आणि मदतकार्य सुरू
अपघातानंतर पोलिसांनी, अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्तांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
नाशिकमध्ये यापूर्वीही अपघात
या अपघातापूर्वी 6 जानेवारीला नाशिकमधील मनमाड येथे दोन शाळकरी मुलांना ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. या अपघातात वैष्णवी प्रविण केकान आणि आदित्य मुकुंद सोलसे या दहावीच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातांवरील उपायांची मागणी
वारंवार होणाऱ्या रस्ता अपघातांमुळे नागरीकांमध्ये संतापाची भावना असून वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
🔥 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात ‘टकला’ व्हायरसचा धुमाकूळ, फक्त ३च दिवसात होतायत लोक टकले.
🔥 टकला व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, आयसीएमआरच्या अहवालाची प्रतीक्षा