महाराष्ट्रात सौर कृषी पंप योजनेची शानदार अंमलबजावणी, देशात प्रथम स्थान Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Maharashtra Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Maharashtra Solar Agriculture Pump Scheme: महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana) अंमलबजावणीत देशात प्रथम स्थान मिळवले आहे. डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ सौर पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ १०% रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप यांचा संपूर्ण संच मिळतो.

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana) योजनेची घोषणा केली होती आणि साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली या योजनेला गती देण्यात आली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या पंपांचा प्रश्न सोडवला जात आहे.

महावितरणने या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून, शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून अर्ज मंजूर झाल्यावर पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी केली जाते, आणि त्यानंतर कार्यादेश जारी होतो.

सौर पंपांच्या खास वैशिष्ट्यांमुळे शेतकऱ्यांना दिवसा कधीही सिंचनाची सोय होऊ शकते. सौर पॅनेल्स २५ वर्षे वीज निर्माण करत असल्याने शेतकऱ्यांना वीजबिल भरावे लागत नाही. पारंपरिक वीजपुरवठ्यापासून स्वतंत्र असलेल्या या पंपामुळे शेतकऱ्यांची ऊर्जा आवश्यकता पूर्ण केली जाते.

महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात २१,९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले, जे आतापर्यंतच्या सर्वाधिक आकड्यांपैकी एक आहे. २०१५ ते २०२३ पर्यंत एक लाख ८० हजार सौर पंप बसवले गेले होते, मात्र मार्च २०२४ पासून आतापर्यंत आठ महिन्यांत एक लाख ५८ हजार पंप बसविण्यात आले आहेत.

Share This Article