Majhi Ladki Bahin Yojana December Installment 1500 Rs: महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
पहिल्या टप्प्यात 12.87 लाख महिलांना लाभ
अदिती तटकरे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबवलेल्या योजनेच्या हप्त्यांचे वितरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नव्याने आधार लिंक केलेल्या 12,87,503 महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात 67.92 लाख महिलांना मिळणार रक्कम
दुसऱ्या टप्प्यात 67,92,292 पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारने जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा केले होते. मात्र, निवडणुकांमुळे डिसेंबरच्या हप्त्याला विलंब झाला होता.
अधिवेशन संपल्यानंतर हप्ता वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरित करण्याची घोषणा केली होती. अधिवेशन 21 डिसेंबर रोजी संपले असून, आजपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
पात्र महिलांना आर्थिक मदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
नवीन अर्जदारांनाही मिळणार लाभ
ज्या महिलांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले आहेत, त्यांच्याही खात्यात मागील हप्त्यांसह सर्व रक्कम जमा करण्यात येत आहे.